भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्याला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. या विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाबरोबर नवीन ट्रेनर असणार आहे. कारण भारतीय संघाचे आधीचे ट्रेनर शंकर बासू यांनी 2019 विश्वचषकानंतर बीसीसीआयबरोबरील करार संपल्याने या पदाचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे आता सोहम देसाई हे भारतीय संघाबरोबर विंडीज दौऱ्यादरम्यान प्रभारी ट्रेनर म्हणून असणार आहे.
सध्या बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक आणि अन्य सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. पण भारतीय संघासाठी नवीन सपोर्ट स्टाफची नियुक्ती होईपर्यंत 2019 विश्वचषकानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा करार संपल्यानंतरही त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे.
मात्र शंकर बासू आणि फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फऱ्हार्ट यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयने सोहम देसाईची प्रभारी ट्रेनर म्हणून निवड केली आहे.
सोहम देसाई हे सध्या बंगळूरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी जोडलेले असून आत्ता भारत अ संघाबरोबर वेस्ट इंडिजमध्ये आहेत. पण जेव्हा भारताच्या वरिष्ठ संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होईल तेव्हा देसाई भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होतील. तर भारतीय अ संघाबरोबर त्यांच्याऐवजी विवेक रामाक्रिष्णण बदली ट्रेनर म्हणून काम पाहतील.