मुंबई / डहाणू. ( विशेष प्रतिनिधी ) :– मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कष्टकऱ्यांसाठी विविध मागण्या डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, कोरोना च्या पाश्वभूमीवर संपूर्ण देशात आपण सर्वजण मिळून या महा भयानक विषाणू शी मुकाबला करत आहोत. पण, त्यात प्रामुख्याने शेतकरी व कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. त्यातल्या त्यात हातावरचे पोट असलेल्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. लॉकडाऊन मुळे घरात रहावे लागत आहेत मग खाणार काय ? या सर्व बाबींचा विचार करून भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) राष्ट्रीय सचिव कॉ. सीताराम येचुरी यांनी केलेल्या व्हिडीओ लाइव्ह व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे यांच्या सोबत संपर्क करून आमच्या वतीने काही मागण्या आम्ही कष्टकरी वर्गासाठी केली आहे. त्यात आवश्यकतेनुसार वैयक्तिक सुरक्षा साधने पीपीई मिळवावीत आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत, कोरोना तपासण्यांची गती वाढवावी, सर्व बिगर-आयकर दाता कुटुंबांच्या खात्यामध्ये ताबडतोब ७५०० रु. रोख हस्तांतरण करण्यास केंद्र सरकारवर दबाव आणावा, सर्व गरजूंना मोफत अन्न वितरित करावे, आर्थिक दिलासा पॅकेजमध्ये सध्याच्या ०.८ टक्क्यांवरून, जीडीपीच्या कमीत कमी ५ टक्के इतकी वाढ केंद्राने करावी, उत्पादन खर्चाच्या दीडपट या हिशेबाने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा आणि काम असो वा नसो, सर्व नोंदणीकृत मनरेगा मजुरांना मजुरी द्यावी, कामगार / कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावून घेतला जाणे आणि वेतनकपात यापासून त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या मालकांना आर्थिक सहाय्य द्यावे, स्थलांतरित कामगारांची आपापल्या घरी परत जाण्याची व्यवस्था करावी, हातावर पोट असलेल्या पण बँक खाते नसलेल्या व रेशन कार्ड नसलेल्यांकडे राज्य शासनाकडून एक अर्ज भरून मदत करण्यात यावी. अश्या मागण्या आम्ही केल्या असल्याचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगत यावर राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ संबंधित विभागाला आदेश द्यावेत असे सांगितले.