माझा जिल्हा माझी जबाबदारी !!  

12 जून 2021 रोजी बीडला असल्याने बीड शहरातील लोकप्रिय दैनिक वृतपत्र हातात घेऊन वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच दृष्टिक्षेपात नजर गेली त्या बातमीकडे ती म्हणजे बीड शहरातील कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या 130 आणि बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 296 .गेल्या दीड वर्षापासून कोविड मध्ये काम करत असताना मनात विचार येतो की, अरे नेमकं चाललय काय आपल्या बीड जिल्ह्यामध्ये. बीडची परिस्थिती पाहताना असं वाटतं डोकं शांत ठेवून बसावं आणि विचारा अंती काहीतरी निष्कर्ष समोर यावा आणि तो आपण जगा समोर मांडावा.. वाढती रुग्ण संख्या,नियमांची पायमल्ली,सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, सिटीस्कॅन रॅकेटिंग, तपासण्यांचा गोंधळ, कोविड केअर सेंटर वरील गोंधळ अशा एक ना अनेक बातम्या वाचायला ऐकायला मिळतात, त्याही माझ्या जिल्ह्याबद्दल. आणि एकीकडे मुंबईसारख्या महानगरांमध्ये आपण काम करून रुग्ण सेवा देत आहोत आणि कोविड रुग्णांना पूर्णपणे बरे करून घरी पाठवून आपली महानगरी आपण कोविड मुक्त करत आहोत. मुंबई शहर कोविड मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असताना माझ्या जिल्ह्यातून अशा बातम्या आजही ऐकायला मिळतात याचं खरोखर वाईट वाटतं. इतकच काय 26 मे रोजी मला महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब च्या वतीने आणि महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते सुपर नर्स पावर बाय इंडियन ऑइल यांच्यावतीने “सुपर नर्स” हा किताब बहाल करण्यात आला. मग माझ्या जिल्ह्याची ही परिस्थिती असताना हा मिळालेला किताब घेऊन फक्त आनंदोत्सव साजरा करायचा की आपल्या जिल्ह्याची बाजू सुधारावी म्हणून काही तरी प्रयत्न करायचे हाच विचार माझ्या डोक्यात घर करून आहे.

मागील महिन्यात एम.आय.डी.सी.प्रेझेंट महाराष्ट्र टाइम्स सुपर नर्स पावर बाय इंडियन ऑइल यांचे प्रथमतः आभार. खरंतर हा अवॉर्ड मुंबई, ठाणे पालघर, वसई,नवी मुंबई या ठिकाणी काम करणार्‍या अनेक सार्‍या नर्स भगिनी मधील काही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुपर नर्सची निवड करण्यात आली. मुंबई तसेच नवी मुंबई आणि मुंबई उपनगरातील दहा जणींनीची सुपर नर्स प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे… याचा अर्थ असा नाही की, फक्त या दहा जणीच या महामारीत काम केले, यांच्या सारख्या तमाम लाखो-करोडो नर्सेसनी या महामारी मध्ये आपले कर्तव्य पार पाडले आहे आणि आजही पार पाडत आहेत. गेल्या दीड वर्षापासून सतत तत्परतेने आपली जबाबदारी चोखपणे बजावत, आपल्या जीवाची पर्वा न करता त्या आपले कार्य करत राहणार आहेत.   

महाराष्ट्र टाइम्सने हा उपक्रम नर्सेस विक बद्दल परिचारिकांचे आभार व्यक्त करण्याकरिता राबवला व किशोरीताई पेडणेकर महापौर मुंबई यांच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे या सर्व दहा परिचारिकांचे अभिनंदन करण्याचा प्रोग्रॅम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमाच्या वेळेस महापौर किशोरीताई पेडणेकर या बोलताना यांनी या सुपर नर्सेसचे अभिनंदन करत त्यांना मार्गदर्शन ही केले. किशोरीताई ज्या स्वतःएक सुपर नर्स होत्या  आणि सध्या मुंबईच्या महापौर आहेत. त्या म्हणाल्या की तुम्ही जे कोविडमध्ये काम केलेलं आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि भविष्यात ही असेच काम करत राहा म्हणून सर्वांची पाठ थोपटली.

एक अदृश्य शक्ती असते जी आपल्याला आणि आपल्या कामाला नोट करत असते आणि त्याचा चोख व्यवहार देखील ठेवत असते तर या अदृश्य शक्तीलाच आपण लक्षात घेऊन आपलं कार्य हे इमानदारीने बजावायची असतातअसा संदेश त्यांनी तमाम नर्सेसना दिला.खरं तर त्यांचा हा संदेश तमाम हेल्थकेअर सिस्टीमनेच घेण्यासारखा आहे असे मला आवर्जून सांगावसं वाटेल. खरंतर किशोरीताई पेडणेकर यांच्यासोबत लाइव्ह कन्वर्सेशन  म्हणजे कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण तो सत्यात उतरला होता. सुरुवातीला तर विश्वास बसत नव्हता पण ज्या वेळेस किशोरीताई पेडणेकर स्वतः बोलत होत्या त्यावेळेस विश्वास करावाच लागला. जश्या किशोरीताई बोलत होत्या, “तश्या गेल्या वर्षांमध्ये घडलेल्या सर्व गोष्टींना पुन्हा एकदा उजाळा मिळत होता” कोविड मध्ये काम करत असताना फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर होतं ते म्हणजे की निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे रुग्णसेवा द्यायची.ठाम उपचारपद्धती नव्हती, बेड नव्हते, मनुष्यबळ कमी पडत होतं, इतकंच काय तर अस्थापनाचा हि गोंधळ उडालेला होता. अशा परिस्थितीत आपल्या परीने आणि आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला जितकं काही या महामारी मध्ये परिश्रम घेता येईल तेवढे परिश्रम घेऊन विजय मिळे पर्यंत कार्य करत राहायचे असा निश्चय आम्ही केला होता. विजय मिळेपर्यंत काम करत राहायचं हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम अविरतपणे चालू होतं आणि आजही चालू आहे. गेल्या वर्षभरामध्ये घरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडत होत्या परंतु तिकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त कामच करायचे हे ठरवले होते. सामाजिक बांधिलकी जपत ह्या सगळ्यातून बाहेर आल्यावरच मी घरच्या गोष्टीत लक्ष देईल असे स्पष्ट भावाला सांगितले. त्यानुसार त्याने सुद्धा त्या गोष्टींना पाठिंबा दिला.                             

घरची जेमतेम परिस्थिती त्याच्यावर ती मात करत माझं दहावीपर्यंतचं शिक्षण शाहू विद्यालय येथे पूर्ण झाले. नर्सिंगच्या डिप्लोमा पुण्यातील ससून रुग्णालय येथे पूर्ण केला. डोळ्यामध्ये स्वप्न होते की फक्त डिप्लोमा करून थांबायचे नाही तर पुढेही आपलं शिक्षण चालू ठेवायच. आणि पुढचं शिक्षण मुंबईतूनच पूर्ण करायचं ही गोष्ट ही तेव्हाच ठरवलेली जेव्हा ससून रुग्णालय येथे डिप्लोमा कोर्स कम्प्लीट करत होती.डिप्लोमा कोर्स संपला तशी मी मुंबई गाठली मुंबईमध्ये पर्यटन स्थळ न पाहता मुंबईतील सगळी रुग्णालय इंटरव्यू देण्यासाठी म्हणून पालथी घातली आणि शेवटी आशा पारेख रुग्णालय येथे एक वर्ष रुग्णसेवा दिली तब्बल एक वर्ष सेवा दिल्यानंतर मला मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी) चा जॉब मिळाला आणि मी बी.एम.सी के.ई.एम हॉस्पिटल येथे रुजू झाले. खूप काही शिकले आणि काम करत करतच एम एस सी इन कार्डियाक नर्सिंग एस एन डी टी चर्चगेट येथून पूर्ण केले, तसेच एमबीए इन हेल्थकेअर हेदेखील वेलिंगकर माटुंगा या  इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केले. 

शिक्षणाची बाजू भक्कम बनत गेली. तसंच 2020 मध्ये कोविड महामारी मध्ये काम करावं लागणार होत. नुसतं काम करावंच लागणार नव्हतं तर हेल्थकेअर सिस्टीमचा एक मध्यबिंदू म्हणून किंवा हेल्थकेअर सिस्टीमचा एक मजबूत कणा म्हणून किंवा कुठल्याही रुग्णालयाचा एक हार्ट म्हणून नर्सेस काम करत असतात तर त्याच गोष्टी लक्षात घेऊन कोविडमध्ये ही आपण प्रामाणिक पणे आणि एक निष्ठेने काम करायचं ठरवलं.सुरुवातीचा काळ खूप कठीण होता खूप ठिकाणाहुन विरोध झाला अनुभव नसताना वयाने कमी असताना क्लिनिकल मधला अनुभव घेऊन आस्थापना विभागाची जबाबदारी देखील सांभाळली.खूप अथक परिश्रम घ्यावे लागले. आपलं काम कोणीतरी पाहतोय म्हणून आपण योग्य काम करणे किंवा प्रामाणिक पणे काम करणे ही धारणा न ठेवता अगदी भान हरवून आपल्या कामाशी एकनिष्ठ होऊन आपण काम करायचं एवढाच निश्चय होता. दिवस वर्षा सारखे भासत होते सहा महिने घरची वाट पाहिली नव्हती. आईवडिलांशी भावाशी फक्त व्हिडिओ कॉल वरती बोलणं होत होतं. जेवणामध्ये घरच जेवण भेटत नव्हतं त्यामुळे वजन कमी झालं होतं. हॉटेल मध्ये राहायचं हॉटेल मधून हॉस्पिटल मध्ये ड्युटी करायची हॉस्पिटलमधून हॉटेलमध्ये झ्या डान्स ग्रुप परिवाराची तत्परता ही तितकीच प्रामाणिक होती.आपण जे काम करतोय ते काम कोणी नोटीस करेल किंवा त्याचा दाखला भविष्यात मिळेल याची कधीच कल्पना नव्हती. पण आपण आपले जे पण कामाचे तास आहेत ते प्रामाणिकपणे पार पाडायचे किंवा वेळ पडेल तर अधिक तास देऊन आपलं काम पूर्ण वेळेत करायचं हीच माझी धडपड असायची. याच कामाची दखल पूर्ण स्तरावर घेतली गेली आणि माझावर नव्हे तर आमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोविड मधून जशी माझी कर्मभूमी मुक्त झाली आहे तशीच माझी जन्मभूमी पण लवकरात लवकर मुक्त होईल. आणि या पारितोषिकाचे सार्थक ठरेल तसेच पारितोषिक मिळाल्याचा तेव्हाच आनंद ही होईल. तरी या प्रसंगी जेव्हा मुंबई माझी कर्मभूमी कोविड संसर्गापासून मुक्त होत आहे त्याच वेळी मला बीडकरांसाठी एक मॅसेज द्यावासा वाटेल आणि तो म्हणजे, परस्थिती आणीबाणीची आहे म्हणून घाबरून न जाता या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा.पण या परिस्थितीला सामोरे जात असतानाच आपली सामाजिक बांधिलकी जपत आपण शासनाने घालून दिलेले नियम पाळा.       

एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून आपली वागणूक अशी असू द्या जेणेकरून संसर्ग हा  होणारच नाही किंवा कमी होईल आणि डब्ल्यू.एच.ओ ने घालून दिलेल्या गाईडलाईन्स पूर्णपणे फॉलो करा. आता खरंच वेळ गेली आहे त्रिसूत्री पाळा म्हणायची! पण तरीही आवर्जून सांगावसं वाटेल त्रिसूत्री म्हणजेच साबण पाण्याने हात धुवा मास्क वापरा आणि सोशल डिस्टंसिंग वापरा या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कोविड पासून दुर ठेउ शकतात. जरी उद्या कोविड वरती आपण शंभर टक्के विजय मिळवला तरी कोविडच्या उपचारांनंतर  होणारे दुष्परिणाम यांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.त्याचे प्रमाणही कमी होण्यासाठी व्यक्तीक स्वच्छता पाळा.होईल तेवढं स्टिरॉइड्स अँटिबायोटिक्स टाळा. जेणेकरून भविष्यातील दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागणार नाही आणि दुष्परिणाम काय पाहण्याची वेळ परत तुमच्यावर येणार नाही. हे सर्व टाळण्यासाठी मुळात तर तुम्ही आधी स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला कोविडच होणार नाही. मला तुम्हाला एवढंच सांगावसं वाटेल की बेसिक मास्क आणि सोशल डिस्टन्स वापरला तर कोविड होणार नाही आणि कोविड पासून होणारे दुष्परिणाम टाळले जातील. त्यामुळे घरातच रहा सुरक्षित रहा “माझ कुटुंब माझी जबाबदारी” नवे तर, “माझा जिल्हा माझी जबाबदारी” समजून सामाजिक बांधिलकी जपत प्रशासनाला मदत करा. आपण सुजाण नागरिक असल्याचे उभ्या महाराष्ट्रा समोर सिद्ध करून दाखवा. सुपर नर्स टायटल हा जरी समाधान कारक असला तरी तो पूर्णपणे आनंददायी तेव्हाच होईल जेव्हा माझा जिल्हा माझा महाराष्ट्र आणि माझा भारत हा कोरोना मुक्त होईल.

 तरी या पूर्ण काळामध्ये दीड वर्षांमध्ये ड्युटी करत असताना स्वतःला सुरक्षित ठेवून इतरांची सेवा करणे शक्य झाले असले तर ते फक्त सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि आई-वडिलांच्याया प्रेमामुळे शक्य झालं आहे. तरी भविष्यामध्ये हा लढा जिंकेपर्यंत खंबीरपणे उभे राहण्यासाठी बाबा, आई पप्पा,भाऊ,आणि पूर्ण मित्रपरिवार,तसेच सहकारी मित्र-मैत्रिणी यांचे आशीर्वाद व शुभेच्छा सदैव पाठीशी रहावे हीच प्रार्थना. 

जय हिंद जय महाराष्ट्र.. 

भाग्यश्री बळीराम सानप. के ई एम रुग्णालय मुंबई 9082863640

Check Also

पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करा

🔊 Listen to this   प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन …