
अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- जिल्ह्यातील माणसाला जगण्यासाठी अन्न, पाणी व प्राणवायूची नितांत गरज असते.या जीवनावश्यक तीन गोष्टींसाठी मृदसंधारण,जलसंधारण व वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे.सामाजिक जबाबदारीतून नव्हे तर किमान स्वतःच्या स्वार्थासाठी तरी प्रत्येक माणसाने झाडे लावून ती जगवावीत आणि पाण्याची बचत करावी असे आवाहन पर्यावरण व जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.
भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यालयाने प्रायोजित केलेल्या आणि नगर आकाशवाणी केंद्रावरून “किसान वाणी” कार्यक्रमात दि.21 जुलै रोजी प्रसारित झालेल्या मुलाखतीत जलमित्र सुखदेव फुलारी बोलत होते.नगर आकाशवाणीचे निवेदक भय्यालाल टेकम यांनी “पर्यावरण संतुलनासाठी जमीन आणि पाण्याचे पुनर्भरण” या विषयावर ही मुलाखत घेतली.
श्री.फुलारी पुढे म्हणाले, जल,जंगल,जमीन व जनावरे या घटकांचे संगोपन-संवर्धन झाले तरच पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकते.झाडांच्या माध्यमातून निसर्गाने मोफत दिलेल्या ऑक्सिजन ची किंमत मानवाला कधीच कळली नाही ती आता कोरोना महामारीमुळे कळाली. माणसाला जगण्यासाठी मुबलक पाणी, ऑक्सिजन आणि जमिनीची सुपीकता हवी असेल तर वृक्ष संवर्धनाची गरज आहे.शेत जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहून जाते आणि त्या पाण्याबरोबर जमिनीतील सुपीक मातीचा थर ही वाहून जातो.शेत जमिनीचा सुपीक मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षांचा कालावधी लागतो.म्हणून तो वाहून जाऊ नये यासाठी मृद व जलसंधरणाचे उपचार करून वाहून जाणारे पाणी शेतातच आढवून ते जमिनीत जिरविले पाहिजे.असे केल्याने मृद संधारणा बरोबरच जलसंधारण आणि जल पुनर्भरण होईल.
राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि जलसाक्षरता केंद्र,यशदा यांचे माध्यमातून भूजल पुनर्भरण कसे करायचे,गावातील-शेतातील पाण्याचा ताळेबंद कसा तयार करायचा,उपलब्ध पाण्यावर आधारित पीक पद्धती कशी ठरवायची याबाबद ग्राम पातळीवर प्रत्येक नागरिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे.
जमीन,पाणी आणि जंगल या त्रिकोणाचा योग्य पद्धतीने साधला गेला पाहिजे.झाडी ऑक्सिजन देतात,जमिनीची सुपीकता वाढवितात आणि जमिनीत पाणी धरून ठेवण्यास मदत करतात.म्हणून किमान स्वतःच्या अन्न,पाणी आणि ऑक्सिजनसाठी तरी प्रत्येक माणसाने झाड लावून ते वाढविले पाहिजे आणि पाण्याचा काटकसरीचा करून पाण्याची बचत ही केली पाहिजे.