तहसीलदारच्या बंधारे भरून द्या या पत्राला केराची टोपली
अहमदनगर (प्रतिनिधी) :- मुळा धरणाच्या टेलच्या भागातील जोहरपूर,भातकुडगाव,हिंगणगाव, भायगाव, बक्तरपुर, देवटाकळी, खामगाव, लोळेगाव येथील शेती व तलाव, बंधारे तातडीने भरण्यासाठी पूर्ण दाबणे पाणी द्या अन्यथा आपल्या कार्यालयाला मंगळवारी सकाळी 12 वा.आ.बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत सर्व पक्षीय कार्यकर्त्ये,शेतकरी टाळे ठोकून धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे व तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी कार्यकारी अभियंता,मुळा पाटबंधारे विभागाला दिला आहे.
संबधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यात अल्पसा पाऊस आहे.कमी ओलीवरच खरीपाच्या पेरण्या करण्यात आल्या.पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत.तालुक्यात अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहेत. यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत आहे.ही पाणी टंचाई कमी होण्यासाठी शेवगावचे तहसिलदार विनोद भामरे यांनी कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांना तालुक्यातील मुळा टेलच्या भागातील बंधारे,तळे भरून द्यावेत असे पत्र सोमवारी (दि.26) पाठवले आहेत.शासन पिण्याच्या पाण्याला प्राध्यान क्रम देत असले तरी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाकडून तहसीदार यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा शेतकर्यामधून चर्चिली जात आहे.
मुळा टेलच्या भागातील शेतकर्यांनी वेळोवेळी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्याशी संपर्क साधून लेखी पत्रव्यवहार केला संतप्त झालेल्या शेतकर्यांनी पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा येथे गुरुवारी (दि.22) तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.संबधित खात्याकडून फक्त लेखी आश्वासन दिले जाते.त्याची अमलबजावणी मात्र केली जात नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.त्याचा उद्रेक मंगळवारी होणार्या आंदोलन वेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुळा पाटबंधारे विभागाने शेतकर्यांचा अंत न पाहता तातडीने टेलच्या भगात पूर्ण दाबाने पाणी आणून शेतीसह तळे,बंधारे भरून द्यावेत अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्ये आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला मंगळवारी (दि.3 )सकाळी 12 वा. टाळे ठोकून धरणे आंदोलन करतील असा इशारा निवेद्नाव्दारे प्रहार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी,प्रकाश बेरड,अजित धस,अजय महाराज बारस्कर, तालुकाध्यक्ष संदीप बामदळे,तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव,जोहरपूरचे माजी सरपंच अशोक देवढे,दादासाहेब देवढे,यादवराव जाधव, मारुतराव काकडे,बाबासाहेब जाधव, बाळासाहेब वाघमारे,भगवान विधाटे,शंकर खेडकर,संजय ढगे यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते,शेतकर्यांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक,मुळा कार्यकारी अभियंता,अहमदनगर, तहसिलदार ,उपविभागीय अभियंता चिलेखनवाडी,अमरापुर यांना देण्यात आल्या आहेत.
विधानसभेच्या तोंडावर खरीप आवर्तन सोडण्यात आल्याने श्रेय वादात पाणी अडकले आहे.या पाटपाण्यात राजकीय हस्तक्षेप वाढला असल्याने अधिकारी वर्गाला नियोजन करण्यात अडथळा येत असल्याचे अधिकारी खाजगीत बोलताना सांगितले.अधिकार्यांना पोलीस संरक्षण मिळत नाही.मग अधिकार्यानी काम करावं कस असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिकार्यानी यात लक्ष घालावे.तरच टेलच्या भागाला पाणी मिळेल अन्यथा टेलच्या भागातील शेतकर्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.दोन दिवसात पाटपाण्यातील राजकारण थांबवलं नाही तर लोकप्रतिनिधीच्या विरोधात आंदोलन छेडू.
बाळासाहेब जाधव
संचालक – तालुका सहकारी खरेदी विक्री संघ,शेवगाव