कर्जत सुभाष माळवे
खेड(ता.कर्जत)येथील भीमा नदीपात्रावरून राशीन गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.या योजनेसाठी स्वतंत्र रोहीत्राची जोडणी करण्यात आली आहे.मात्र गेली पाच दिवसांपासून ही योजना खंडित झाल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याचा मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.राशीनच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खेड येथील पाणी पुरवठा योजनेला भेट दिली असता या योजनेसाठी असलेल्या स्वतंत्र रोहीत्रावरून भगीरथ पाणी उपसा संस्थेकडुन विजचोरी केली असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.’भगीरथ’च्या अतिरिक्त विजचोरीमुळे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे विजपंप जळाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी आक्रमक झाले.राशीन येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता एस.ए.जाधव यांना फोनद्वारे विजचोरीचा प्रकार कळवून त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.यावेळी ‘भगीरथ पाणी उपसा संस्था बंद असुन केबलच्या सहाय्याने राशीनच्या पाणी पुरवठा योजनेवरून विजचोरी करण्यात आली. विजचोरीसाठी वापरण्यात आलेली केबल ताब्यात घेण्यात आली असुन भगीरथ संस्थेच्या योजनेला सील करण्यात आले असल्याचा पंचनामा महावितरणकडुन पंचांच्या साक्षीने करण्यात आला.
वारंवार असा प्रकार घडत असल्याचा आरोप करत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी केली.ऐन उन्हाळ्यात राशीन येथील तीस हजार ग्रामस्थांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे?प्रशासन जाणुन बुजून संबंधीतांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक अभियंता जाधव यांना धारेवर धरले.’यापुर्वीही भगीरथवर तीन वेळा कारवाई करण्यात आली असुन कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर पंचनामा पाठवणार असल्याचे सहाय्यक अभियंता एस.ए.जाधव यांनी सांगितले.
यावेळी राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख,सरपंच पती भिमराव साळवे,ग्रामविकास अधिकारी अनिल भोईटे,ग्रा.पं.सदस्य दिपक थोरात,नाझिम काझी,दया आढाव,हर्षल आढाव,विद्युत सहाय्यक एस.डी डाके आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन!
खेड येथुन राशीनसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या रोहीत्रावरुन विज चोरी करून भगीरथ पाणी उपसा संस्था सुरू करण्यात आली होती.त्यामुळे अतिरिक्त विजभार झाल्याने संबंधित योजनेचे विजपंप जळाले असल्याने हे विजपंप दुरुस्त होईपर्यंत ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपसरपंच शंकर देशमुख यांनी केले आहे.