जामखेड येथील एका कोरोना बाधिताचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह तर एकाला मिळणार डिस्चार्ज
अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे जामखेड येथील ०२ कोरोना बाधित तरुणापैकी एकाचा चौदाव्या दिवसा नंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर दुसऱ्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ०४ अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात दिनांक ०७ मे रोजी मृत्यू झालेल्या धांदरफळ येथील व्यक्तीचा समावेश आहे. या व्यक्तीने खाजगी लॅब कडून केलेला अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुन्हा त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठवून त्याची पुष्टी करून घेतली. काल धांदरफळ येथे आढळून आलेले ०६ बाधित रुग्ण या व्यक्तीच्या संपर्कातील होते.
दरम्यान, जामखेड येथील ०२ कोरोना बाधित रुग्णांचा १४ दिवसा नंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, आज दोन्हीपैकी एका रुग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता पुन्हा ०७ दिवसांनंतर त्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. नेवासा येथील कोरोना बाधित व्यक्तीचा १४ दिवसा नंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे अजून १७ अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत १७१२ स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १६०३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. ५२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या जिल्ह्यात ४७४ जणांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून ४४३ जणांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.