लॉकडाऊन’ काळात नेवासा तालुक्यातून कोट्यावधींची वाळू तस्करी? ; छावा’च्या जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप : सखोल चौकशीची केली मागणी

 

नेवासा (प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ काळात नेवासा तालुक्याच्या विविध भागांतून अक्षरशः कोट्यावधी रुपयांची वाळू तस्करी झाल्याचा खळबळजनक तसेच गंभीर आरोप ‘छावा’ क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. ‘लॉकडाऊन’ मध्ये घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर लाठ्या चालविणाऱ्या महसूल व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कल्पना नसेल असे म्हणणे केवळ धाडसाचे ठरणार असल्याने याप्रकरणी उच्चस्तरिय सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
‘छावा’ क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षकांना लेखी निवेदन देऊन या धक्कादायक प्रकाराकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि.24 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्यावरुन पायी तसेच वाहनांतून फिरणाऱ्या सर्वसामान्य लोकांना पोलीस व महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अक्षरशः फोडून काढल्याचे नमूद करुन मात्र व्यापक लोकहिताच्या दृष्टीकोनातून त्यांचा याला मुळीच आक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन नेवासा तालुक्यातील वाळू तस्करांनी चांगलेच उखळ पांढरे करुन घेतल्याकडे काळे यांनी लक्ष वेधून यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठाम दावा त्यांनी केला आहे. लॉकडाऊन काळात नेवासा तालुक्यात पोलीस व महसूल विभागाची करडी नजर व गस्त असतानाही तालुक्याच्या विविध भागांतून कोट्यावधी रुपयांची वाळू चोरीस गेलीच कशी? असा खडा सवाल त्यांनी या निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. लॉकडाऊनच्या अतिसंवेदनशील काळात नेवासा तालुक्यात सुरु असलेल्या वाळू तस्करीची पोलीस व महसूल विभागाला कल्पना नसेल ही कल्पनाच मुळी हास्यास्पद असल्याचे काळे यांनी यात नमूद केले आहे. नेवासा तहसील तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यास लॉकडाऊन काळात या परिसरात प्रामुख्याने कोणाचा राबता जास्त होता ते स्पष्ट होईल असा दावाही त्यांनी केला आहे. या कालावधीत ज्या काही बोटावर मोजण्यासारख्या वाळू तस्करांच्या वाहनांवर कारवाई केल्याचे काही वृत्तपत्रांतून नियोजनबद्धरित्या छापून आणले गेले. त्या सर्व कारवाया ‘मॅनेज’ असल्याच्या वास्तवाकडेही काळे यांनी लक्ष वेधले आहे. यातील बऱ्याच कारवाईंची पोलीस तसेच महसूल दप्तरी नोंदच नसल्याची खळबळजनक माहिती त्यांनी समोर आणली आहे.
त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तसेच शासनाचा महसूल बुडवून नेवासा तालुक्यात सुरु असलेल्या वाळू तस्करांच्या नंगानाचाची उच्चस्तरिय सखोल चौकशी करुन यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी काळे यांनी केली असून याप्रकरणी टाळाटाळ झाल्यास संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा गर्भित इशारा त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना दिला आहे.

गोलमाल है सब गोलमाल है’ –
लॉकडाऊन काळात तालुक्याच्या विविध भागांत वाळू तस्करांच्या वाहनांवर कारवाया करण्यात आल्याचे नेवासा प्रशासनानेच प्रसिद्धी माध्यमांतून जाहीर केले आहे. मात्र त्यांनी जाहीर केलेल्या काही वाहनांवरील कारवाईचे रेकॉर्ड पोलीस किंवा महसूल दप्तरी आढळून येत नसल्याने ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ अशी प्रतिक्रिया ‘छावा’चे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

Check Also

कर्जत तालुका पत्रकार संघाच्यावतीने गहू व तांदळाची मदत

🔊 Listen to this कर्जत ( प्रतिनिधी ) : – कर्जत तालुका पत्रकार संघाच्यावतीने कर्जत …