नेवासा ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील पाचेगाव येथे रविवारी पहाटे बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील रोख 15 हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, गावातील पुरोहित दिनेश दत्तात्रय कुलकर्णी गावातील गहिनीनाथ महाराज मंदिरा शेजारी पाचेगाव फाटा रस्त्या लगत भरवस्तीत राहतात. त्यांची दोन्ही मुले नोकरीस असल्याकारणाने ते श्रीरामपूर येथे राहतात. दिनेश कुलकर्णी हे पाचेगाव येथील घरातच राहतात.पण शनिवारी सायंकाळी श्रीरामपूर येथे आपल्या मुलांकडे गेलेले होते. घरी कोणी नाही, या संधीचा फायदा घेत रविवारी पहाटे चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील सामनाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेली रोख 15 हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली.पाचेगाव बिट हवालदार शिंदे यांनी भेट दिली. घटनास्थळी काही पायाचे ठसे आढळून आल्याने ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचेगाव बिट हवालदार मोहन शिंदे हे करणार असल्याचे समजते.
चोर हे परिसरातील असल्याचा संशय गावातील नागरिकांनी व्यक्त केला असून घटनेची माहिती पाचेगाव-पुनतगाव येथील पोलीस पाटील संजय वाकचौरे यांनी दिली होती. रविवारी उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.