अहमदनगर ( प्रतिनिधी )-:- कोरोनाचे संकट असले तरी जिल्ह्यात खरीपाची तयारी सुरु आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बी- बियाणे, खते,कीटकनाशके यांची टंचाई जाणवू नये, यासाठी पूर्ण नियोजन केले असून सर्व घटकांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. तसेच, खते आणि बियाणांचा काळाबाजार करण्याचा प्रकार केला तर अशा दुकानदार आणि कंपन्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातून विविध मतदारसंघातील आमदार आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि खरीप हंगाम पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांची उपस्थिती होती.
या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आ. लहू कानडे, आ. मोनिका राजळे आणि आमदार रोहित पवार यांनी सहभाग घेऊन त्या-त्या तालुक्यातील तसेच खरीप हंगामात शेतकर्यांना जाणवणार्या विविध अडचणी सांगितल्या.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खरीप हंगामातील बियाणांची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. युरिया खताचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत राहील, त्याचा साठेबाजार होणार नाही, यासाठी भरारी पथके स्थापन करुन तपासणीचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.
यावर्षीही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे खरीप हंगामात चांगले उत्पादन येईल, असा अंदाज असल्याचे ते म्हणाले. शेतकर्यांना सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही, त्यासाठी नियोजन करावे. शेतकर्याना पीक विमा आणि हवामानाधारित फळपीक विमा योजनेचा लाभ कसा मिळेल, यादृष्टीने त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अनेक दुकानदार हे एका विशिष्ट कंपनीची खते किंवा बियाणे घेण्याचा आग्रह करतात. अशा दुकानदारांवर कारवाई झाली पाहिजे. असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.
यावेळी विविध लोकप्रतिनिधींनी खरीप हंगामातील आवश्यक सूचना केल्या. मनरेगाची कामे सुरु व्हावीत, लोकांच्या हाताला काम द्यावे, खरीप कर्जवाटपाकडे लक्ष द्यावे आणि शेतकर्यांना वेळेत कर्ज मिळेल, यादृष्टीने बॅंकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावर, पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी, अग्रणी बॅंक अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना अशा सूचना दिल्याचे सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत १२७ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याची माहिती त्यांनी दिली.
आपल्या जिल्ह्याला महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा राज्यात सर्वाधीक लाभ झाला आहे. या योजनेंतर्गत शेतकर्यांचे १४६० कोटी रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे ते म्हणाले. याशिवाय, राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात आले आहे.
Check Also
जामखेडमधी कोरोना बाधीत व्यक्तीचे २ मित्र पॉझिटिव्ह ; जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ४०.वर
🔊 Listen to this अहमदनगर ( प्रतिनिधी ):- जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी …