अहमदनगर ( प्रतिनिधी ) : – कोरोना (कोव्हीड – 19) या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्ये झाल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरिता संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. या लॉकडाऊनच्या काळात काही अनुज्ञप्ती अवैध पद्धतीने दारु विक्री करत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. यावर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष अनुज्ञप्ती उघडून तेथील मद्यसाठ्याची मोजदाद केली असता त्यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने गुन्हा नोंदविण्यात आला तसेच हा अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सादर केला. साथ रोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे उल्लंघन केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी जिल्ह्यातील एकूण ०९ दारु विक्री दुकाने (अनुज्ञप्त्या) तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये सात परमिट रूम, एक बिअर शॉपी व एक देशी मद्य किरकोळ विक्रेता यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द का करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा पुढील सात दिवसांच्या आत या कार्यालयास सादर करण्यात यावा, असे त्यांना बजावण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अनुज्ञप्तीमध्ये हॉटेल गोविंदा गार्डन ( निमगाव जाळी, ता. संगमनेर), हॉटेल नेचर ( वडगावपान, ता. संगमनेर), हॉटेल गोल्डन चॅरियट (बेलापुर, ता. श्रीरामपूर), हॉटेल धनलक्ष्मी (देवळाली प्रवरा), हॉटेल उत्कर्ष (सोनगाव सात्रळ, ता. राहुरी), हॉटेल ईश्वर (वडझिरे, ता. पारनेर), हॉटेल मंथन ( निघोज, ता. पारनेर), देशी दारू किरकोळ विक्री सीएल-3 अनुज्ञप्ती, संगमनेर आणि आनंद बिअर शॉपी (निमगाव को-हाळे, ता. राहाता) या अनुज्ञप्तींचा समावेश आहे.
शासनाच्या अटी व नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात यापुढे जे अनुज्ञप्तीधारक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अशाच स्वरुपाची कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर यांनी दिला आहे.
दरम्यान, लॉकडाउनच्या कालावधीत दिनांक 24 मार्च, 2020 ते 28एप्रिल.2020 पर्यंत राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर विभागाने अवैद्य मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री धंद्यावर धडक कारवाई करुन एकुण 154 गुन्हे नोंद करुन 52 लाख 4 हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 59 आरोपींना अटक करण्यात आलेली असुन 11 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत अ विभाग, ब विभाग, श्रीरामपूर विभाग, कोपरगाव विभाग, संगमनेर विभाग, असे एकुण 5 विभाग व भरारी पथक क्रमांक 1 व 2 असे एकुण 2 भरारी पथके कारवाई करत आहेत. तसेच यापुढेही अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द तक्रार स्वीकारण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभाग नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18008333333 व व्हॉटसअॅप क्रमांक 8422001133 असा आहे. सदर क्रमांकावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवु शकतात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांनी कळविले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील या पुर्वीच्या 3 व आताचे 9 अशा एकुण 12 अनुज्ञप्ती लॉकडाऊन मध्ये निलंबीत करण्यात आलेल्या आहेत.