आदरणीय मौलानासाहेब व सर्व समाजबांधव यांना पवित्र रमजान निमित्त शुभेच्छा..!
सभी को माहे रमजान मुबारक
आज सर्व जगाप्रमानेच आपल्या महाराष्ट्रावर देखील कोरोना नावाचे संकट आलेले आहे आपण सर्व मिळून या संकटाशी मुकाबला करीत आहोत ; करणार आहोत. या अदृश्य व सांसर्गिक रोगास दूर ठेवण्यासाठी घराबाहेर पडूच नका, अगदीच गरजेचे असेल तरच बाहेर पडा तोंडाला मास्क लावा व सामाजिक अंतर पाळा असे आपणास सांगण्यात आले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपापल्या परीने जीवापाड प्रयत्न करीत आहेत. यासाठी राज्य बंदी, जिल्हा बंदी, जनता कर्फ्यु, संचार बंदी, लॉकडाऊन आदी प्रयत्न करून आपल्याला या रोगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आपल्या तालुक्यातील स्थानिक प्रशासन देखील तब्बल एक महिन्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता या रोगास तालुक्यात येऊच न देण्यासाठी आहोरात्र झटत आहे. या कालावधीत आपल्याला समजावण्यासाठी आपल्यातीलच काहींना सौम्य व मवाळ भाषेत सांगितले गेले; काहींशी वाद – विवाद करण्याचे प्रसंग आले तर प्रसंगी इच्छा नसतानाही कठोर भूमिका घेऊन काठीचा वापरही करावा लागला व हे सर्व आपल्या व आपल्या कुटुंबाच्या हितासाठीच व याचे फलित म्हणूनच आजपर्यंत आपल्या तालुक्यात कोरोना बाधित वा संशयित सुध्दा रुग्ण नाहीत. यासाठी दक्ष संघटनेनेही जनजागृती करण्यासाठी प्रशासनाला चांगली साथ दिली आहे प्रथमतः या सर्वांचे जाहीर आभार .
उद्या पासून पवित्र रमजान महिन्यास सुरुवात होत आहे. इस्लामचे प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे व शिकवणी नुसार आपण सर्वांनी या रमजान महिन्याचे स्वागत करून रमजानचे रोजे, नमाज याबरोबरच जेवढी करता येईल तेवढी ईबादत करावी. परमेश्वराचे नामस्मरण करावे एकमेकांशी चांगले वर्तन व मदत करण्याची भावना ठेवावी. आपल्या शेजारी राहत असलेले सर्व आपलेच बंधू आहेत त्यांच्याशी प्रेमान, सहकार्याने राहावे परोपकार वृत्ती व माणुसकीचा धर्म पाळावा कोणीही आपल्यापासून दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.
त्यातच अचानक आलेल्या या संकटाला तोंड देताना ही आपली परीक्षाच ( आजमाईश ) आहे असे समजून त्यास सामोरे जावयाचे आहे, लढा द्यायचा आहे. यासाठी आपल्याला ठरवून दिलेल्या वेळातच आपल्या सहेरी व इफ्तारी च्या तयारीसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करावी आपल्यातील ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी शेजारील, जवळ असलेल्या व त्यानंतर परिस्थिती माहीत असलेल्या सर्वांचीच मदत करण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे आपल्याला सांगितले आहे की आपण करत असलेल्या मदतीचे, सहकार्याचे प्रदर्शन किंवा जाहिरात न करता शक्य असेल ती मदत करावी. याचा योग्य मोबदला आपल्याला निश्चित मिळणार आहे. आजची ही आणीबाणीची परिस्थिती व त्यात रमजान महिन्यात करावयास मिळणारे पुण्य कर्म म्हणजे सोने पे सुहागा असेच म्हणावे लागेल.
रमजान महिन्यात सदका, खैरात, जकात, फित्रा करणे रमजान मध्ये हे फार मोठे पुण्य कर्म समजले जाते. या महिन्यात त्याचा सवाब फार जास्त असतो. तर आज हे सर्व करण्याची गरज आहे व आपल्याला याची संधी मिळाली आहे अनावश्यक खर्च कमी करून आपल्या गरजवंत बांधवांना मदत करा याचा बदला हमखास व चांगला मिळणार आहे.
आज आपले आयुष्य व सध्याची घडी ही आपल्याला मिळालेला बोनस आहे हे समजून या संधीचा लाभ घेऊन पुण्य कर्म समजा अथवा जबाबदारी वा कर्तव्य समजून या पवित्र महिन्यात घेता येईल तेवढे पुण्य पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण प्रत्येकाला माहीत आहे आपण बरोबर काहीही आणलेले नव्हते व घेऊनही जाऊ शकत नाही. तर या आलेल्या जागतिक आपत्तीत आपणच एकमेकांच्या उपयोगी पडू शकतो यासारखी संधी पुन्हा मिळो ना मिळो या दुष्ट आपत्तीचे आपण इष्ट आपत्तीत निश्चित रूपांतर करू शकतो.
शासनाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने दि. १८ एप्रिल रोजी आपल्या सर्वांसाठी कोरोना ( कोविड -१९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान महिन्यामधील नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारी च्या अनुषंगाने एकत्र न येण्याबाबत पत्र दिलेले आहे सर्वांनी रमजानचे पावित्र्य पाळत आपल्या घरीच ईबादत करावयाची आहे व शासनाला सहकार्य करायचे आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात छोटेखानी बैठक संपन्न झाली असून सर्व मुस्लिम बांधवांना तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यावतीने रमजान निमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
शकील भाई शेख
जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक विकास परिषद, अहमदनगर