
अहमदनगर ( प्रतिनिधी ):- जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील 45 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 44 वर पोहोचली आहे. त्यातील 25 जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 17 जण उपचार घेत आहे. दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत एकही रुग्ण आढळला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे नगरचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाला आहे. त्यानंतर दुसर्याच दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. सदरची व्यक्ति शेतमाल घेऊन मुंबईला गेली होती, असे समोर आले आहे.