लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक
अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक करून कन्टेन्मेन्ट झोन वगळता अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत. तसेच संदर्भ क्र.12 अन्वये राज्यातील लॉकडाऊनची मुदतवाढ दि.17 मे 2020 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन, जिल्हादंडाधिकारी अहमदनगर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास या आदेशान्वये दि.04/05/2020 ते दि.17/05/2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालील बाबींस मनाई करीत आहे.
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील.
वैदयकिय सेवा, एअर अम्बुलन्स व सुरक्षा अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्या हवाई प्रवासी वाहतुक व्यतिरिक्त सर्व प्रकारची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.
सुरक्षा अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्या रेल्वे वाहतुकी व्यतिरिक्त सर्व प्रकारची रेल्वे प्रवासी वाहतुक.
केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिल्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची सार्वजनिक आंतरराज्य बस वाहतुक.
मेट्रो रेल सेवा.
वैद्यकिय कारण अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिल्या व्यतिरिक्त आंतरराज्य वैयक्तिक प्रवास
शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक / प्रशिक्षण / कोचिंग क्लासेस इत्यादी. (तथापी ऑनलाईन । दुरस्थःशिकवणी यास परवानगी राहिल.)
गृहनिर्माण / आरोग्य / पोलीस / शासकीय आस्थापना / आरोग्य कर्मचारी, अडकलेले मजुर आणि विलगीकरण सुविधा संबंधी आदरातिथ्य वगळता सर्व प्रकाराच्या Hospitality सेवा.
सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाटयगृह, बार, प्रेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्सम ठिकाणे बंद राहतील.
सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, Academic,सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्यादीसाठी सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास मनाई राहील.
सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे नागरिकांचे प्रवेशासाठी बंद राहतील.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर संध्याकाळी 7.00 ते सकाळी 7.00 या कालावधीत निर्बध राहील.
65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.
Containment Zone मध्ये ओपीडी व मेडिकल क्लिनीक चालविण्यास मनाई राहील.
सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील.
तसेच अहमदनगर जिल्हयातील Containment Zone वगळता सदरचा आदेश खालील उपक्रमांचे (Activities) बाबतीत लागु होणार नाही.
क) कृषी विषयक बाबी:-
• कृषी विषयक सर्व कामे
तुर, कापूस व हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे व्यवहार सुरु राहतील.
ज्याठिकाणी फळे, भाज्या, धान्ये यांचा लिलाव होतो, अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ घाऊक व्यापारी, अधिकृत/ नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच प्रवेश करण्याची मुभा राहील. सदर लिलावांच्या ठिकाणी हात धुण्याची पुरेशी व्यवस्था, हॅण्ड वॉश, सॅनिटाईजर्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांची असेल. तसेच लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असणा-या सर्व संबंधितांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. आयुक्त, अहमदनगर शहर महानगरपालिका व मुख्याधिकारी सर्व (नगरपालिका/ नगरपंचायत) यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांना वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य करावे.
कृषी यंत्राशी संबंधित Custom Hiring Centers (CHC) सुरु राहतील.
कृषी संबंधित उपकरणे / यंत्रे यांची निर्मिती, वितरण व त्यांची किरकोळ विक्री करणारे सर्व दुकाने, दुरुस्ती करणारी सर्व दुकाने, खते, किटकनाशके व बी-बियाणे यांची दुकाने सुरु राहतील.
पिक कापणी, मळणी, काढणी यांच्या वापरात येणारी यंत्रे, उपकरणे उदा. हारवेस्टर व तत्सम यांना राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतूकीची परवानगी असेल.
शेत माल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्पादन, साठवणुक, वाहतुक व विक्री.
ख) आस्थापना:-
• शासकीय कार्यालयामध्ये उपसचिव व त्यावरील दर्जाचे अधिकारी 100 टक्के पर्यंत उपस्थित राहु शकतील. तसेच शासकीय कार्यालयामध्ये उर्वरित अधिकारी/कर्मचारी यांची आवश्यकतेनुसार 33 टक्के पर्यंत उपस्थिती राहील. तथापि, संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्य व कुटूंब कल्याण, पोलीस, कारागृह, होमगार्डस्, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थान व संलग्न सेवा, एनआयसी, सिमाशुल्क, भारतीय अन्न महामंडळ, एनसीसी, एनवायके आणि महानगरपालिका/नगरपालिका यांच्या सेवा कोणत्याही निबंधाशिवाय कार्यरत राहतील.
• खाजगी कार्यालयमध्ये आवश्यकतेनुसार 33% पर्यंत कर्मचा-यांसह सेवा सुरु राहतील.
इलेक्ट्रॉनिक माध्यमे (ब्रॉडकास्टींग, डीटीएच, केबल सेवा), माहिती तंत्रज्ञान व त्यावर आधारीत सेवा (50% कर्मचारीसहीत) ग्रामपंचायत स्तरावरील सीएसपी सेंटर्स सुरु राहतील. मात्र त्यांनी सदर सेवा पुरवितांना Social Distancing चे पालन काटेकोरपणे करावे.
वर्तमानपत्रे व मासिक यांचे व्दारवितरण ग्राहकाच्या पूर्वसंमतीने अनुज्ञेय राहील. तथापि, व्दारवितरण करणा-या व्यक्तीस सॅनिटायझार व मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच त्यांनी Social Distancing चे पालन काटेकोरपणे करावे.
कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊसेस, खाजगी सुरक्षा सेवा, इमारतींचे देखभालीकरीता सहाय्यभुत ठरणा-या व्यवस्थापन सुविधा सुरु राहतील.
वीज निर्मिती, वितरण आणि पारेषण यांचेकरीता आवश्यक असणा-या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर्सची दुरुस्ती करणारे दुकाने / वर्कशॉप सुरु राहतील.
महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील बाजारपेठ व बाजार संकूलात जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरु राहतील.
महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील एकल (stand alone), वसाहती लगत असणारी, निवासी संकूलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि, अशा भागात एखाद्या गल्लीत/रस्त्या लगत 5 पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारीच दुकाने सुरु राहतील.
ग्रामीण भागात मॉल्स वगळता, इतर सर्व प्रकारची दुकाने सुरु राहतील.
वरील सर्व दुकानांमध्ये सामाजिक अंतर (Social Distancing) च्या तत्वांचे पालन करणे बंधनकारक राहील. कुठल्याही दुकानासमोर अनावश्यक गर्दी दिसल्यास ते दुकान सील करण्यात येईल. तसेच आस्थापना प्रमुखावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
घ) सामाजिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम:-
बालके/दिव्यांग/मनोरुग्ण/जेष्ठ नागरीक/बेघर/निराधार महिला/विधवा यांची निवारागृहे, निवासगृहे सुरु राहतील.
अल्पवयीन मुलांची निवारागृहे व निरीक्षणगृहे सुरु राहतील.
जेष्ठ नागरीक/विधवा/स्वातंत्र्य सैनिक/संगायो /इंगायो यांच्या निधीचे वाटप, तसेच निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधी विषयक सेवा सुरु राहतील.
सर्व अंगणवाडी सेविका या दर पंधरा दिवसाला बालके, महिला, स्तनदा माता यांचा पोषण आहार घरपोच देतील. कोणत्याही लाभार्थ्याला अंगणवाडीत बोलावले जाणार नाही.
च) मत्सोत्पादन व पशुसंवर्धन:-
• मत्स्यव्यवसाय व त्या संबंधित प्रक्रिया करणारे सर्व उद्योग सुरु राहतील.
• मत्स्य बीज उत्पादन व खाद्य पुरवठा करणारे उद्योग सुरु राहतील.
• दुध व दुग्धजन्य पदार्थ यांची खरेदी, विक्री, प्रक्रीया, वितरण करणारे, वाहतूक व पुरवठा करणा-या यंत्रणा सुरु राहतील
• पशुसंवर्धनाशी संबंधित गोशाळा, पोल्ट्री फार्म व पशूखाद्याशी संबंधित असलेले, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे उदा. मका व सोया सर्व घटक सुरु राहतील.
छ) वनोत्पादन संबंधित:-
• पेसा, बिगर पेसा व वनविभागाचे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये तेंदूची पाने गोळा करणे, वनोषधी गोळा करणे, प्रक्रिया करणे, वाहतूक व विक्री व तत्सम उद्योग सुरु राहतील.
• वनातील इमारती लाकूड गोळा करुन लाकूड डेपोमध्ये साठा/वाहतूक/विक्री करता येईल.
• वनीकरण व रेशीम लागवडी संबंधित कृती.
ज) वित्तीय क्षेत्र:-
• SEBI अंतर्गतचे बाजारसेवा,IRDA अंतर्गत असलेल्या विमा कंपन्या, को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी सुरु राहतील.
झ) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील सर्व कामे :-
• Social Distancing चे पालन करुन सुरु राहतील व योजनेत काम करणारे सर्व कर्मचारी / मजूर यांनी काम करतांना मास्कचा वापर करावा.
• मनरेगाची कामे हाती घेतांना जलसिंचन व जलसंधारण विभागातील कामांना प्राधान्य देण्यात यावे.
ट) सार्वजनिक सोयीसुविधा:-
• पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, इ. इंधन आणि गॅस क्षेत्रातील कामे. उदा. Refining, वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्री सुरु राहील (डिझेल विक्री 24.00 तास व पेट्रोल, एलपीजी इंधन विक्रीची वेळ सकाळी 05.00ते सकाळी 09.00वाजेपर्यंतच राहील)
• विज निर्मिती, पारेषण व वितरण सुरु राहील.
• पोस्टल सेवा (पोस्ट ऑफिस सहीत),कुरिअर सेवा देणा-या आस्थापना, टेलीकम्युनिकेशन व इंटरनेट सेवा सुरु राहतील.
• महापालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थामधील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची कामे सुरु राहतील.
• दुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे सुरु राहतील.उदा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे,वाहनाद्वारे पशुखाद्य पुरवठा करणे.
• शासकिय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम/ आस्थापना, बँक, ATM, विमा सेवा
• अंत्यविधी (जास्तीत जास्त 10 व्यक्ती) ,
• फळे व भाजी-पाला, LPG गॅस वितरण सेवा
• औषधालय- औषधालयामधुन नियमित वेळेत औषधांची विक्री करण्यात यावी.
• प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक) नियतकालिके, टि.व्ही. न्युज चॅनेल इत्यादींचे कार्यालय
• चिक्स, चिकण व अंडी दुकाने व वाहतुक सेवा
• जनावरांचे खाद्य, खुराक, पेंड विक्री दुकाने व वाहतुक सेवा
• पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतुक सेवा
ठ) वाहतूक क्षेत्र:-
• सर्व वस्तू व मालाची वाहतूक, ने-आण करता येईल. रेल्वेव्दारे वस्तू, माल, पार्सल, यांची ने-आण करता येईल.
• सर्व प्रकारचे वस्तू व माल वाहतूक करणार ट्रक व तत्सम वाहने हे वाहतूक करतांना केवळ दोन चालक व एक हेल्पर यांच्या सोबतच वाहतूक करतील. तसेच माल, वस्तू पोहोच केल्यानंतर रिकाम्या झालेल्या वाहनांना देखील वाहतूकीसाठी परवानगी असेल, तथापि, वाहन चालवणा-याकडे वैध परवाना असणे अनिवार्य राहील.
• ट्रक व तत्सम माल वाहतूक करणा-या वाहनांची दुरुस्ती करणारी दुकाने सुरु राहतील.तथापि, संबंधितांना केंद्र व राज्य शासनाच्या सुचना, आदेश, निर्देशांचे गांभियाने पालन करावे लागेल व Social Distancing चे नियम पाळावे लागतील.
• रेल्वे वाहतकीच्या ठिकाणी कामावर जाणारे अधिकारी/ कर्मचारी, कंत्राटी कामगार यांना संबंधित आस्थापना यांनी दिलेल्या अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगूनच कामावर हजर राहता येईल.
• अत्यावश्यक सेवांकरीता चारचाकी वाहनांमध्ये केवळ वाहनचालक व इतर दोन व्यक्ती यांना परवानगी राहिल व दुचाकी वाहनांकरीता केवळ वाहन चालक यांनाच परवानगी राहील.
मात्र जीवनावश्यक वस्तूंचे खरेदीकरीता लोकांना जवळचे दुकानावर पायीच जाणे अभिप्रेत आहे. (टॅक्सी ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, खाजगी दुचाकी व खाजगी कार यांना कोणत्याही प्रकारे वाहतुकीची परवानगी असणार नाही.)
• केवळ अनुज्ञेय असलेल्या कामांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनेच व्यक्ती आणि वाहनांच्या आंतरजिल्हा हालचालीस परवानगी राहील.
ड) बांधकाम क्षेत्र:-
• रस्ते बांधणी, सिंचन प्रकल्प, सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांची बांधकामे (ग्रामीण भागातील सुक्ष्म, लघू व मध्यम प्रकल्पासहीत), पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणा-या तारा ओढणे, ऑप्टीकल केबल / फायबर यांचेशी संबंधित बांधकामे सुरु राहतील. तथापि, संबंधित कामांची पडताळणी त्या त्या विभागातील संबंधित अधिकारी यांनी करावी. तसेच या प्रकारच्या कामावर असणा-या मजूरांची जेवणव राहण्याची सोय संबंधित ठेकेदार यांनीच करावी व Social Distancing चे पालन केले जाईल, याची दक्षता घ्यावी. कामाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पुरेशी सुविधा, मास्क, सॅनिटाईजर्स/साबण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार यांची राहील.
• अत्यावश्यक मान्सुन पूर्व कामे, इमारतीचे शटरिंग, वॉटरप्रुफींग, पुर संरक्षण, इमारतीची रचना व दुरुस्ती,असुरक्षित इमारती पाडणे, रिन्युएबल उर्जा प्रकल्पांची कामे सुरु राहतील.
• ज्या ठिकाणी कामावर कामगार उपलब्ध आहेत व बाहेरील ठिकाणाहून कामगार आणण्याची परवानगी आवश्यकता नाही, अशा प्रगतीपथावर असणा-या बांधकाम प्रकल्पांची महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील कामे सुरु राहतील.
• ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी राहील.
बांधकामाचे ठिकाणी खालील बाबींचे पालन करावे.
1) Social Distancing चे नियमांचे पालन करावे.
2) हात धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा/साबणचा वापर करावा.
3) सर्वांनी मास्क वापरने बंधनकारक राहील.
ढ) उद्योग / औद्योगिक आस्थापना :-
(अ) नागरी भागातील उद्योग आणि औद्योगिक आस्थापनांना शिफ्ट मध्ये कामकाज चालविणे व योग्य ते सामाजिक अंतर (Social Distancing) चे काटेकोर पालन करुन खालील उद्योग सुरु ठेवता येतील.
नागरी भागातील उत्पादन व इतर औद्योगिक आस्थापना ज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZs) आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स (EoUs), औद्योगिक वसाहती आणि Containment Zones नसलेल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहती.
जीवनावश्यक वस्तुंचे उत्पादन करणारे उदयोग,औषधे, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, त्यांचे कच्चा माल आणि मध्यावस्था माल यासह आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांचे युनिटस्
आयटी हार्डवेअरचे उत्पादन उद्योग.
पॅकेजिंग सामग्रीचे उत्पादन उदयोग .
(ब) ग्रामीण भागातील सर्व उद्योग आणि औद्योगिक आस्थापनास शिफ्ट मध्ये कामकाज चालविणेस व योग्य ते सामाजिक अंतर (Social Distancing) चे काटेकोर पालन करुन सुरु राहतील.
या आदेशाप्रमाणे वरील बाबींना सुट दिलेली असली तरी लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीयदंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील.