कर्जत (आशिष बोरा यांज कडून):- करपडी ग्रामस्थ गेली दीड महिन्यापासून भीषण पाणीटंचाईला तोंड देत असून कोरोनाच्या संकटकालीन काळात टँकर प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून आंदोलना चा इशारा देऊ लागले आहेत आहेत.
कर्जत तालुक्यातील करपडी गावाला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून ग्रामपंचायतने दीड महिन्या पूर्वी पंचायत समितीस टॅंकर प्रस्ताव दिला आहे. तरी अद्याप त्यास मंजुरी मिळत नसल्याने नागरिकाचा संयम सुटू लागला आहे. सध्या गावातील सर्व लोकाना पाणी विकत घ्यावे लागत असून 200 लीटर च्या बॅरल साठी 50 रूपये मोजावे लागत आहेत, पाणी पुरवठा तलाव तीन महिन्यापासून कोरडा पडलेला असून टँकर सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठवल्यानंतर पंचायत समितीचे ल पा चे उपअभियंता सी. एम. पवार यांनी गावामध्ये येवुन पाणी पुरवठा, उदभव विहीर, तलाव यासह परिसराची पाहणी करून टँकरची गावाला गरज असल्याचे तोंडी ग्रामपंचायत पदाधिकार्याना सांगितले होते व तात्काळ टॅकरने पाणी पुरवठा सुरू करू असा तोंडी शब्द देऊनही गेले होते मात्र अद्याप गावात टँकर सुरू न झाल्याने गावाला भीषण पाणी टंचाई ला तोंड द्यावे लागत आहे, याबाबत आज करपडी ग्रामपंचायती मध्ये बैठक घेण्यात आली यावेळी सरपंच भागवत खेसे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल काळे, अशोक माने, रामकृष्ण लाहोर, कांताताई कांबळे, व ग्रामसेविका वर्षा थोरात आदी उपस्थित होते, शासकीय पाण्याचा टँकर सुरू होण्याबाबत पंचायत समितीकडे यावेळी चौकशी करण्यात आली, तालुक्यात कोठेही टँकरची आवश्यकता नाही असे अधिकारी सांगत असून लवकरात लवकर टँकर सुरू न केल्यास शासकीय नियम पाळून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुनिल काळे यांनी दिला आहे आहे.