भारतात “कोरोनाचा जागतिक मृत्यूव्युह” प्रथम तोडण्याचा सन्मान मुंबईच्या मातृसत्ताक वरळी कोळीवाड्याला मिळाला!. दि 22 एप्रिल 2020 चा “टाइम्स ऑफ इंडिया” म्हणतो, “वरळी कोळीवाडा हे कोरोना व्हायरस नियंत्रणाचे आदर्श उदाहरण ठरू शकते”! कोविड -19 स्थितीच्या परिस्थितीचे आकलन करून घेण्यासाठी मुबंईत आलेल्या केंद्रीय सदस्यांच्या पाच सदस्य समितीस (आयेएमसीटी) वाटते की, “वरळी कोळीवाडा” हे कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव असलेल्या उर्वरित देशातील शहरांसाठी एक “मॉडेल” ठरावे. “कोरोना जागतिक महामारी” अर्थात साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक या मध्यवर्ती समितीने केले. राज्यातील रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढत असताना म्हणजे राज्यातील दर 6.3 प्रति दिन असताना तो मुबंईत 4.3 प्रतिदिन आहे. कस्तुरबा हॉस्पिटल आणि बीएमसी मुख्यालयाव्यतिरिक्त अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षते खालील पथकाने मंगळवारी जी दक्षिण वार्डला भेट दिली. कोविड -19 “हॉट स्पॉट्स” म्हणून उदयास आलेल्या वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर ही झोपडपट्टी आहे. जी दक्षिण प्रभागात 17 एप्रिल पर्यंत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. त्यात कोविड -19 पॉझिटिव्ह ची 389 प्रकरणे होती. त्यानंतर महानगर पालिकेने वरळीकर नागरिकांचे, ऐतिहासिक सहकार्य घेऊन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली “उत्तम” काम केले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमवो)ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात जोशी म्हणाले की वरळी कोळीवाडा हे देशातील कोरोना व्हायरस मुक्त झोनचे उत्तम उदाहरण ठरू शकते आणि त्या भागात काम केलेल्या कामप्रमाणेच इतर भागातही असेच काम केले तर ते कोरोना साखळी खंडित करण्यासाठी मदतीचे काम होईल. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी कोरोना महामारी हाताळण्याचा या प्रयत्नां बाबत खूप चर्चा केली परन्तु ज्या वरळी कोळीवाडा नऊ पाटील जमात गावठाणातील इतर लोक आणि मच्छिमार बांधवांसाठी काहीच वेळ न दिल्यामुळे ही स्वतःची, पाठ थोपटून घेण्याची नेहमीचीच “शासकीय भूमिका” गावकऱ्यांना आवडली नाही!. लाॅकडाऊन उपायांची पोलिसी कारवाई “कडक” होती. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा याबाबत कोळीमहिलांची लढाऊ भूमिका ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांची “पोलखोल” करणारी ठरली!. वरळीकर हे आद्य मुबंईकर असूनही आरोग्याच्या पायाभूत सुविधाबाबत येथून 900 किलोमीटर वरील गडचिरोली सारखीच स्थिती आज मच्छिमार बांधवांची आहे.
केंद्रीय समितीला हे “कळावे!” तरीही अत्यन्त सौम्य शब्दात केंद्रीय समितीने मुबंई महानगर पालिकेस सांगितले, की शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर व व्हेंटिलेटर्स चा पुरेसा पुरवठा करावा! शेवटी माझा देश महान!(??). कोळी लोकांच्या कोलंबी, जिताडा, पापलेट, बोंबिल, चिम्बो-या मत्स्य आहाराच्या या “शारीरिक प्रतिकार शक्तीनेच ” ही कोरोनाची लढाई जिंकण्यास मदत झाली, असे म्हणण्यास हरकत नसावी. त्याचप्रमाणे मागील 2000 वर्षांपासून हुंडा नाकारण्याची “स्त्रीसत्ताक” परंपरा जपणाऱ्या अस्सल भारतीय संस्कृतीचे केंद्र असलेल्या आगरी कोळी,भंडारी, धर्मातरीत ख्रिशन कोळी वस्तीचा संकटावर विजय मिळविण्याचीही परंपरा “प्राचीन” आहे!
बौद्ध सम्राट अशोकाच्या 2000 वर्षे जुन्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी आणि छत्रपती शिवरायांच्या नौदल परंपरेत, मानाचे “सुवर्णपान” म्हणजे लढाऊ आरमारी सागरपुत्र “मातृसत्ताक संस्कृती”! कोरोना महामारी असो किंवा सागरी युद्धातील जीवघेणी संकटे, तुफानी वादळ वारे, यावर रामरक्षा सारख्या श्लोक किंवा “महामृत्युंजय” मंत्राने विजय मिळत नसतो !!! तर मानवी बुद्धी, शरीर आणि मनशक्तीनेच विजय मिळविता येतो, हे आगरी कोळ्यांना खूपच पुरातन काळापासून कळलेले “जीवनसत्य” आहे.
कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या वरळीकर लोकांना “ताबालिकी” समाजाप्रमाणेच बदनाम करण्याचे काम मीडिया आणि सरकारी यंत्रणेने करू नये अशा आशयाचे लेख सुरुवातीस मी लिहिले होते! ज्यांच्या कडे स्वतःची योग्य, प्रामाणिक बाजू मांडण्याची प्रचार, प्रसार, प्रसिद्धी साधने आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी हुशार माणसे नसतात, त्यांना एकतर “गलिच्छ” (SRA)किंवा “अस्पृश्य” ठरविण्याची फार जुनी पद्धत आपल्या देशात आहे. यात त्यांच्या राहत्या जागा, गाव गावठाणे, शेती, मासेमारी व्यवसाय, साधनसामग्री, त्याचे “श्रम” संपादित करून कायमचे पंगू किंवा गुलाम करण्याचा हेतू उच्चवर्णीय,जमीनदार, सत्ताधारी जातींचा असू शकतो! हे आपल्या समाजाचे “जातवास्तव” आहे. अगोदर मुबंईतल्या झोपडपट्ट्या “गलिच्छ” घोषित करून,(SRA) जाहीर करून, त्यांच्या जमिनी अजगराप्रमाणे गिळण्याचे काम आयएएस अधिकारी, मुबंई महानगर पालिका, सत्ताधारीपक्ष, विरोधीपक्ष यांच्या मार्फत बिल्डर भूमाफियांनी केले आहे! यातून या जमीन चोरांची हिम्मत वाढली! आणि त्यांनी आगरी कोळी भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी या मुबंईच्या मूळ रहिवाशांना “गलिच्छ” अशी विधानसभेत विधानपरिषदेत “सरकारी शिवी” देऊन जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला होता! या प्रयत्नात वरळी कोळीवाड्यातील काहि “घरभेदी बिभीषण” सहभागी असावेत. हाच प्रकार मुंबई ची “शिव” असलेल्या सायन कोळीवाड्यातही चालू आहे! येथे 3 ते चार हजार फुटांच्या 12 कोटी रुपये “बाजारमूल्य” असलेल्या, सिमेंट काँक्रीटच्या आलिशान बंगलोना झोपडी म्हणणारे “देशद्रोही” सरकारी अधिकारी आहेत! आणि “आमचेच” फितूर दलाल “चमचेही” आहेत.
ओबीसी, एससी, एसटी, विजेएनटी या महात्मा फुले आणि त्यांचे पट्टशिष्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या, साऱ्या मागासवर्गीय लोकांच्या वर्तमान सरकारी फसवणुकीचा कटू “इतिहास” आहे! उच्च जातींच्या ताब्यात असलेल्या साधन संपत्ती पेक्षा अत्यन्त गरीब दिसत असलेला मागासवर्गीय आगरी कोळी ओबीसी हा सांस्कृतिक अर्थाने लग्नात हुंडा नाकारणारी, महान “मातृसत्ताक जीवनशैली” आजही जगत आहे! साऱ्या देशात हुंडाबळी आणि गर्भातच “स्त्रीभ्रूण” मारणाऱ्या, पुरुषसत्ताक मनुवादी भारतात आपले वेगळेपण, मातृसत्ताक कोलीय लोकांनी कायम जपले आहे. “देव नाकारणारे ते नास्तिक” अशी सरळ व्याख्या लोकांना माहीत आहे! देव ,देवळे आणि धर्मास अफूची गोळी ठरवून नाकारणारे “विचारवन्त” लोकही आहेत! देवांनी मैदान सोडले असे म्हणणारे कट्टर हिंदुत्ववादी, शिवसेना खासदारही आहेत! माणूस संकटात असताना जे देव, देवळे जो धर्म माणसाच्या उपयोगात येत नाही, तो “काल्पनिक” आहे. निरुपयोगी, म्हणून तो नाकारला पाहिजे असे माझे व्यक्तिगत मत आहे. कोरोनाच्या आपत्तीनंतर साऱ्या जगात “अशीच” चर्चा आहे. मानवी रूपातील डॉक्टर, नर्स, पोलीस सफाई कर्मचारी हेच या संकट समयी स्वतःचा जीव देऊन आपणास वाचवित असतील तर देवळे, धर्म आणि देवत्वाची “व्याख्याच” बदलणार आहे. कोरोना नंतरच्या काळात समस्त मानवजातीच्या, येणाऱ्या पिढ्यांनी हे सत्य आपल्या मन बुद्धीत कायम जपावे, यासाठी मी हे लिहितोय. प्रत्यक्ष जगण्यात निसर्ग नियमानुसार आई वडिलांच्या पोटी जन्मणा-या सर्वांचीच “आई” काल्पनिक देव देवतांपेक्षा मोठी असते! याच “सत्य” अनुभवावर आधारित कार्ला लेण्यातील एकविरा आईस, देवी नाही, तर “आई” म्हणण्याचा “प्रामाणिकपणा” आगरी कोळी कराडी भंडारी हा मातृसत्ताक समाज आजही जपतो. व्यक्तिपूजा आणि चमत्काराची लागण साऱ्या भारतात झाल्यामुळे, लोकांना हे वेगळेपण समजत नाही! कोरोनाच्या संकटात पहिल्या टप्प्यात गरीब कष्टकरी लोकांचा विश्वास मंदिरातल्या देवापेक्षा विद्यमान “ठाकरे” सरकारवर अधिक आहे! रोज मोलमजुरी, शारीरिक कष्ट करणाऱ्यांची “भूकही ” तेवढीच मोठी असते! त्यात मागासवर्गीय ओबीसी, आदिवासींच्या जमिनी, पाणी, जंगल, समुद्र, मानवी अधिकार लाटण्याची “मनुवादी” मानसिकता नसते! दिवसभर जेव्हढे प्रामाणिक कष्ट, तेव्हढीच “समाधानी” झोप हीच भगवान महावीर आणि महामाया एकविरापुत्र बुद्ध यांची “श्रमण संस्कृती.” दिवसभर धडपडणाऱ्या निष्पाप, निरागस बालपणात ही “झोप” सर्वाच्याच अनुभवाचा विषय आहे. ती कधी “गायब” झाली हे आठवा! या देशातील श्रमिक, मागासवर्गीय लोकांची आजची स्थिती बिकट आहे, कारण हाताला काम नाही, रोजगार नाही, शारीरिक कष्ट नाहीत, तर “झोप” ही नाही. कष्टकऱ्यांच्या जगण्याचे हे “श्रमण तत्वज्ञान” सत्तेच्या अन दारूच्या, मादक पदार्थाच्या सेवनाने (शील हीन जगणे) झोपणार-यांना कदाचित समजणे “अवघड” आहे! आता जागतिक महामारी कोरोनाच्या मृत्यूची “भीती ” इलेक्ट्रॉनिक माध्यमे फार काळ टिकवू शकत नाहीत, एवढी भीती समोर उभ्या राहिलेल्या “पावसाळा” आणि पेरणी “शेतीकामांची” आहे. हे सरकारी उच्चपदस्थ नोकरदार, उद्योजक शेटजी भटजी यांचे “आर्थिक” नव्हे तर शेती पेरणीचे वर्ष वाया गेले तर खायचे काय? हा प्रश्न आहे! रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड यांच्या सरकारी लिंकिंगमधून खाली थेंब थेंब झिरपणारी,गरीब मागासवर्गीय, कल्याणकारी भारतीय अर्थव्यवस्था, गरिबांना कोणताच “ओलावा” या उन्हाळ्यात देऊ शकत नाही!!! भारतीय भूक “थाळ्या वाजवून, मेणबत्ती पेटवून कळत नाय?? याची जाणीव अस्सल भारतीय संविधानाच्या सुरुवातीच्या, ” we the people of india” या जगद्विख्यात ओळी तिसऱ्या भाषणात घेऊन, मा पंतप्रधान नरेंद्र मोदींना “कळाले”? त्या ऐतिहासिक भाषणाचे स्वागत करतो! या “संविधानिक” शब्दांतील “मानवी भूक” त्यांना कळली तर ते त्यांचा कट्टर,धर्माची देवळे आणि देव विसरून मातृसत्ताक, आई एकविरा मातृसत्ताक विचार म्हणजे काय? हे समजून कार्ला बौद्ध लेण्यांचे नक्की दर्शन घेतील! मानवी पोटाची मनाची भूक ही आत्मा, काल्पनिक देव, चमत्कार, स्वर्ग, पुनर्जन्म यांच्यापेक्षा मोठी आहे! अर्थात निसर्गसत्य जगाला समजाविण्याचे काम बौद्ध लेण्यातूनच झालेय तो विचार तथाकथित अफूची, मनूचीही गोळी नाही तर निसर्गातील समस्त सजीवातील शुद्ध “जीवनविचार” आहे, हे समजून घेतील. भारतीय लोकांना लेण्यांचे हे महत्व समजावे यासाठीच 17 फेब्रुवारी 2020 ते 16 मार्च 2020 असे 29 दिवसांचे बेमुदत आंदोलन सिडको विरोधात सर्व धर्मीय 50 संघटनांनी केले!मच्छिमार, धनगर, मातंग, बौद्ध, आदिवासी, वडार यांच्यासह केरुमाता बौद्ध लेणी नवी मुबंई विमानतळासाठी आपलेच ठाकरे सरकार “उध्वस्त” करणार आहे!कोरोनवर विजय मिळवून पुन्हा हे आंदोलन सुरू राहणार आहे! निसर्गचक्र समजून घेतले तेव्हाच जमीन पाणी आणि आकाशातील वाऱ्यांच्या बदलत्या हालचाली, पर्जन्य सूत्र, जाणून आगरी कोळी सागरपुत्र मुक्तपणे 2000 वर्षे आपले अस्तित्व सागर किनारी आणी “सागरात” ही टिकवून आहेत. त्याच कराडी आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन यांची दहा गावे प्रत्यक्ष आणि दहा गावे अप्रत्यक्ष रित्या शासनाने मुळापासून संपविली आहेत!कोरोनावर विजयाची पहिली सलामी वरळीकरांनी दिलीय!यात अत्यावश्यक गरजा, अन्न धान्य, औषधे नाकारून अचानक बंदिवासात टाकणाऱ्या शासनाविरोधात सोशल मीडियावर, पहिला आवाज वरळीच्या निर्भीड शूर आगरी कोळी महिलांनीच उठविला होता!वरळीतील गावठाण हक्कांसाठी लढणारे ज्येष्ठ विचारवंत, मच्छिमार नेते विजय वरळीकर शेलार मामा प्रमाणे लढले! तर मुंबईच्या 200 कोळीवाडा गावठाणात जमीन हक्क शर्थीने मांडणारे, मार्शल कोळी यांनी युवा आघाडीचे नेतृत्व समर्थपणे केले! आता साऱ्या सागरपुत्र, भूमिपुत्र यांना भूक आणि गरिबी बरोबर लढायचे आहे! महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार याना विनंती आहे. कायमचं होम क्वारंटाईन (चूल आणि मूल) केलेल्या भारतीय स्त्रियांना काय वाटतेय याचाही कानोसा घ्या!आमच्या मातृसत्ताक महिलांनी तो आदर्श देशवासियांना दिलाय!सगळ्याच गोष्टींचा “तब्लिगी” आणि “पालघर” करता येत नाही! मृत्यू हे जागतिक “अंतिम सत्य” आहे! तो मृत्यु कोरोना विषाणूचा असेल नाहीतर उपाशी मजुरांच्या पोटात पेटलेल्या “जठराग्नीचा” असेल! तो “अग्नी” “ज्वालामुखी” होऊ नये असे वाटत असेल तर मग मंदिरे, उद्योगपती, सरकारी तिजोरीत असलेल्या पैशाचा उपयोग अन्न, औषधे, कोरोना रोधक चीजवस्तू डॉक्टर, पोलीस, सफाईकर्मचारी, जनतेस दान करा! म्यृत्यूनंतर उद्या त्यास कुत्रे, कावळे शिवणार नाहीत! निसर्गातील जन्मदात्रीच्या वात्सल्यमय नात्यास “आई एकविरा” हे नाव देऊन समस्त स्त्री जातीस सन्मान देणाऱ्या कोळीवाड्याची “शान” ठरलेल्या जागतिक मातृसत्तेस वंदन! अखेरच्या श्वासापर्यंत शासनाच्या आदेशांच पालन करणाऱ्या घरातच थांबणा-या भारतीय नागरिकांना जय भारत! जय भीम!
राजाराम पाटील,8286031463,
शेतकरी प्रबोधिनी! उरण रायगड,