
संगमनेर( प्रतिनिधी ):- उत्तर नगर जिल्ह्याच्या पाच तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे दीड वर्षात पूर्ण करुन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज संगमनेरमध्ये महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजीत सभेत बोलत होते.
भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरापासून झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत आलेल्या पिचडांच्या मतदार संघात पहिली सभा घेत भाजपने आणि पिचडांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर संगमनेर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळील जाणता राजा मैदानावर आयोजीत जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी शहरात तुम्ही जोरदार स्वागत केले, याचा अर्थ हवेचा रोख बदलत आहे, असे वक्तव्य केले.
अकोले आणि संगमनेर येथील सभेत मुख्यमंत्री बाळासाहेब थोरांतांवर काय टीका करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी थोरातांवर जाहीर टीका न करता केवळ निळवंडे धरणासाठी या सरकारने मोठा निधी दिला आणि विखे यांच्या मागणी प्रमाणे निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे येत्या दीड वर्षात पुर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच थोरातांनी संगमनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याची निळवंडे धरणावरुन आणलेली पाईप लाईन कायम दुष्काळी पट्टा असलेल्या तळेगाव दिघे भागात नेण्यासाठीच्या सर्वेक्षणाची घोषणा केली. यामुळे थोरातांच्या मतदार संघातल्या या भागातील मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला, असे दिसून आले.
संगमनेरमधील सभेत विखे पिता-पुत्रांनी थोरातांवर जोरदार टीका केली. संगमनेर तालुक्यातील दादागिरीची आणि मुठभर लोकांच्या हातात केंद्रीत झालेल्या सत्तेतून लोकांना बाहेर काढायचे असल्याचे विखेंनी म्हटले.