श्रीगोंदे ( शकिलभाई शेख ) :- आढळगाव येथील मुकुंद वाकडे खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी दत्तात्रेय अंकुश पठाडे (वय 27) याला अटक करण्यात आली असुन त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
आढळगाव येथील मुकुंद वाकडे या तरुण शेतकऱ्याचा निर्घृण खून झाला होता. स्थानिक खबरी आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रम कथन केला.
मृताच्या नातेवाईक महिलेचे आरोपी पठाडे याच्याशी अनैतिक संबंध होते. मुकुंद नातेवाईक महिलेला शरीरसंबंंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करीत होता.
त्या महिलेवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला. ही माहिती त्या महिलेने आरोपीला दिली. त्याने मुकुंदला धडा शिकवण्याचे ठरवले. त्या दिवशी मुकुंद घरातून बाहेर पडल्यानंतर संबंधित महिलेने पठाडेला मोबाईलवरून कॉल केला. तिने मुकुंदला “समजावून सांगण्याची’ चिथावणी दिली. त्यामुळे पठाडे हा मुकुंदचा काटा काढण्याच्या तयारीत होता. त्याने मुकुंदचा पाठलाग केला. त्यास अतिप्रसंगाच्या घटनेबाबत जाब विचारू लागला. त्यातून त्यांच्यात झटापट झाली. चिडलेल्या पठाडेने मुकुंदच्या छातीवर चाकूने वार केला. तो पळून जाऊ लागल्यावर पठाडेने पाठलाग करीत त्याला पकडले आणि गळ्यावर वार केला. त्याचा मृत्यू झाल्यावर आरोपीने सूडबुद्धीने त्याचे गुप्तांग कापले.
पठाडेला ताब्यात घेतल्यावर तेथील एका विहिरीत चाकू, अंगावरील कपडे टाकल्याचे त्याने दाखविले. त्यात पठाडेच्या जॅकेटवर रक्ताचे डाग आढळले आहेत. याच जॅकेटचा खिसा मुकुंदसोबत झालेल्या झटापटीत फाटल्याने घटनास्थळी पडलेला पोलिसांना मिळाला होता. हा खिसा, तसेच पठाडेला मुकुंदच्या नातेवाईक महिलेने केलेला शेवटचा कॉल तपासात निर्णायक ठरला.