अहमदनगर, ( प्रतिनिधी ):- जिल्ह्याच्या काही भागात हॉटस्पॉट केंद्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जाहीर केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठीची ती उपाययोजना आहे. त्यामुळे या काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपायांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. हॉटस्पॉट जाहीर केलेल्या भागातील नागरिकांना सर्व जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंचा पुरवठा नियमितपणे आणि वेळेत होईल,याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील मुकुंदनगर, आलमगीर, जामखेड, नाईकवाडपुरा ( संगमनेर), नेवासा, कोपरगाव आदी ठिकाणी कोरोना संसर्ग बाधीत व्यक्ती आढळल्याने जिल्हा प्रशासनाने या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे काहींचे म्हणणे होते. त्यावर, कोरोना विरूध्द लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. या ठिकाणच्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले.
कोरोनापासून बचावासाठी या उपाययोजना केल्या आहेत. उद्देश फक्त तुम्ही सर्वांनी सुरक्षित राहावे व कोरोना व्हायरस विषाणूमुळे संक्रमित होऊ नये इतकाच आमचा प्रयत्न आहे. हॉटस्पॉट केंत्रा आणि संचारबंदी जाहीर केलेल्या काही विभागामध्ये नागरिकांना मनाविरुद्ध राहावे लागत आहे. याची जाणीव आहे. मात्र, आपल्याला जीवनावश्यक कोणत्याही वस्तूंची कमतरता पडणार नाही याचा स्पष्ट सूचना महानारपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. या वस्तूंची कमतरता होणार नाही याची आन्ही काळजी घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही वेळ सर्वांनी सहकार्य करण्याची आहे. सहकार्य केले तर लवकर ही परिस्थिती पूर्ववत होईल, असा मला विश्वास आहे. आपण आणि स्थानिक आमदार संग्राम जगताप निश्चितपणे आपल्याकडे येऊ. मात्र, तुमच्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आम्हीही संयम पाळला आहे. आपणही यासाठी संयम पाळावा. सोशल डीस्टनसिंग पाळावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. येत्या आठवडाभरात आपण पूर्वस्थितीला येऊ. आपण निश्चितपणे या कोरोनाच्या संकटावर मात करू, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.