
नेवासा फाटा (प्रतिनिधी): – कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवरही मुख्यालयाकडे पाठ फिरविणाऱ्या दांडीबहाद्दर कामचोर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दि.१४ मे पासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्वाणीचा इशारा कांगोणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या लेखी निवेदनात रावडे यांनी म्हटले आहे की, नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नसून कार्यालयीन वेळेत नियमितपणे कधीही उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या या मनमानी तसेच कामचुकार कार्यपद्धतीला सरपंचांनी नेहमीच पाठीशी घालण्याची भूमिका घेतल्याचा आरोप रावडे यांनी केला आहे. कोरोना सारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही सदर ग्रामविकास अधिकारी कांगोणीकडे फिरकलेच नसल्याची गंभीर बाब रावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास या निवेदनाद्वारे आणून दिली आहे. ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी हा गावपातळीवरील शासनाचा जबाबदार अधिकारी असल्याने त्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थांना किती अडचणींचा सामना करावा लागत असेल याचा केवळ विचारच केलेला बरा, असे रावडे यांनी हताशपणे नमूद केले आहे.
रावडे यांनी दि.२४ मार्च २०२० रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अहमदनगर जिल्ह्यातील अशा दांडीबहाद्दर ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्यासंदर्भात आठवण करून देत वरिष्ठ पातळीवरच यासंदर्भात असंवेदनशीलता दिसून येत असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरपंचाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची आग्रही मागणी रावडे यांनी केली असून याप्रकरणी टाळाटाळ झाल्यास दि.१४ मे पासून कांगोणी ग्रामपंचयातसमोरील हनुमान मंदिरात आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.