अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- कोरोना बाधित असलेल्या जामखेड येथील दोन आणि संगमनेर येथील चौघा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज या ६ रुग्णाची बूथ हॉस्पिटलमधून तपासणीनंतर घरी रवानगी करण्यात आली. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचार्यांनी स्वागत करुन त्यांना निरोप दिला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ३४ झाली आहे.
दरम्यान, या रुग्णावर उपचार करणार्या बूथ हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र राबणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या यंत्रणांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले. नागरिकांनी लॉकडाऊन काळात दाखविलेल्या संयमाचे आणि सहकार्याचे सर्व मंत्रीमहोदय आणि जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आभार मानत आगामी काळातही सर्वांनी काळजी घेण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्याचे आवाहन केले.
एकूण ४४ कोरोना बाधित रुग्णांपैकी आता ८ रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुनयापैकी १६ व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटीव आले आहेत.
संगमनेर येथे ४ नेपाळी व्यक्ती १४ दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आल्या होत्या. त्यांचे १४ दिवसानंतर स्त्राव नमुने घेतले असता ते पॉझिटीव आले होते. त्यामुळे त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे सात दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटीव आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, जामखेड येथील कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवालही निगेटीव आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६४८ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५५७ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत.