श्रीगोंदा ( प्रतिनिधी ):- दै.सार्वमतचे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी पत्रकार शिवाजी साळुंके हे श्रीगोंदा परिसरातील औटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांना ५ ते ६ जणांनी मिळून जमावबंदीचा कायदा मोडून प्राणघातक हल्ला करून जखमी केले. साळुंके यांच्यावर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून पत्रकार साळुंखे यांच्या फिर्यादीवरून जबर मारहाणीसह पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाले असून आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पत्रकार शिवाजी साळुंके यांना औटेवाडी परिसरातील शेतकऱ्याकडून माहिती मिळाली की कुकडी वितरिका क्रमांक ११ वर काही इसमांनी अनधिकृतपणे वितारिकेला भगदाड पाडून पाणी चोरून चालवले आहे. त्यामुळे ते सकाळी ९ वाजेच्या सुमारास तेथील वितरिकेवर फोटो काढण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे शाखाअभियंता शशिकांत माने हे जेसीबी यंत्राच्या साह्याने भगदाड बुजविण्यासाठी आले असल्याचे दिसले त्यानी वितारिकेला पडलेले भगदाड पाहून फोटो काढण्यासाठी साळुंखे यांनी मोबाईल काढला असता आरोपी आबा सखाराम औटी, दशरथ आण्णा औटी, ज्ञानदेव औटी, भरत औटी, आबा औटी या पाच जणांनी शाखाअभियंता माने यांच्या समक्ष त्यांची मोटारसायकल वितरिकेत ढकलून देऊन शिवीगाळ करत लाथा-बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना वितारिकेच्या पाण्यात ढकलून दिले.
जखमी अवस्थेत त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मदतीने श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याना सांगितला. पो. नि. जाधव यांनी साळुंके यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले त्यानुसार पत्रकार साळुंके यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन श्रीगोंदा ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी दाखल झाले. साळुंके यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आणि भारतीय दंड विधान कलम ३०७ नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी फरार झाले असून आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाल्याची माहिती पो. नि. दौलतराव जाधव यांनी दिली. याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करत आहेत.
पाटबंधारे कडून अद्याप ही गुन्हा दाखल नाही…
कुकडीचे वितरिका क्र ११ काही लोकांनी फोडल्या प्रकरणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार साळुंके याना मारहाण झाली आहे. याबाबत अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि आमची वितरिका फोडली असेल तर आमचे अधिकारी तात्काळ गुन्हा दाखल करायला येतील असे त्यांनी सांगितले. मात्र वास्तविक पाहता कुकडीचे अधिकारी अथवा कर्मचारी वितरिका फोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास कोणीही आले नाही.